आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वित्त विभागाचे अपर मुख्य सचिवांची भेट
*शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी निर्णायक चर्चा; निधी वितरणास मिळणार गती
कार्यकारी संपादक हंसराज एल रामटेके
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.7868988999
चंद्रपूर, दि. १०: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी धानाच्या चुकाऱ्याच्या संदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया अधिक गतीमान होणार आहे. रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये विक्री केलेल्या धानाच्या चुकाऱ्याच्या थकबाकीची रक्कम अद्याप न मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परंतु, आता शेतकऱ्यांचा धान चुकाऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा ठाम विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रालयात वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या प्रश्नावर सखोल चर्चा केली. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी ही चर्चा निर्णायक ठरणार असून, निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल याबाबत सकारात्मक आश्वासन प्राप्त झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल.
चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून रब्बी हंगाम २०२४-२५ करिता शासनाच्या ४३ धान खरेदी केंद्रावर ५१४५ शेतकऱ्यांकडून २,०९,७४४.६२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना धानाच्या चुका-याची रक्कम रु. २७,५२,६०,३८९ /- शासनाकडून प्रदान करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू असून खते, बी बियाणे, कामगाराच्या मजुरीची रक्कम इतर साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना रकमेची नितांत गरज आहे. धानाचे चुकारे मिळाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे नियोजन करणे सोयीचे होईल. मात्र, अद्यापही चुकारे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्याची रक्कम त्वरित प्रदान करण्याबाबत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत पत्राद्वारे मागणी केली होती. मा. मुख्यमंत्र्यांनी त्वरित दखल घेत वित्त विभागाचे सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांना निधी वितरणाचे आदेश दिले. यावेळी सदर विषयाबाबत आज मंत्रालयात वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली असून याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे आश्वस्त केले.


