पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा; सिंदेवाहीत अंत्ययात्रेला नागरिकांचा उस्फूर्त सहभाग.
सत्यशोधक न्यूज
सिंदेवाही प्रतीनीधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तालुका शाखा सिंदेवाहीचे सरचिटणीस तथा एका दैनिक पब्लिक पोस्ट तालुका प्रतीनीधी कर्तव्यदक्ष पत्रकार सचिन गुरुदेव रामटेके (रा. शिवणी) यांचे शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने पत्रकारिता क्षेत्रासह संपूर्ण सिंदेवाही तालुक्यावर शोककळा पसरली असून, दोन निष्पाप चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सचिन रामटेके यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना प्रथम गावातील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच शनिवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शिवणी येथील सचिन रामटेके यांनी अनेक वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. शांत, संयमी, मनमिळाऊ आणि समाजाभिमुख पत्रकार म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच धडपड केली.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड अकाली निघून गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः वडिलांच्या निधनाने दोन चिमुकल्या मुलींच्या भवितव्याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असून, हा प्रसंग अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी शोक व्यक्त करत कुटुंबीयांचे सांत्वन केले. शनिवारी दुपारी ३ वाजता उमा नदीच्या तीरावर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला पत्रकार, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सचिन रामटेके यांच्या अकाली निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजहित जपणारा पत्रकार हरपला असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.



