Monday, June 22, 2026
HomeUncategorizedपरिचारिका म्हणजे रुग्णालयाचा श्वास – आ. किशोर जोरगेवार

परिचारिका म्हणजे रुग्णालयाचा श्वास – आ. किशोर जोरगेवार

*जागतिक परिचारिका दिन साजरा

संपादक : राजेंद्र आर तराले
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न .9404862389

समाजात डॉक्टरांना देव मानले जाते आणि या देवाच्या सेवेला साथ देणाऱ्या परिचारिका म्हणजे त्यांची खरी शक्ती आहे. परिचारिका हा केवळ एक व्यवसाय नसून ती एक सेवा वृत्तीची मूर्ती आहे. परिचारिका म्हणजे रुग्णालयाचा श्वास आहे. त्यामुळे जागतिक परिचारिका दिन हा दिवस केवळ एक औपचारिकता नसून, त्याग, सेवा, सहवेदना आणि माणुसकीच्या सर्वोच्च मूल्यांचा गौरव करणारा दिवस आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
कर्मवीर मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या वतीने प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. दीक्षित, प्रा. पुष्पा पोडे, वर्षा टेंभुर्णे, माया आश्राम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की,
पेशंटच्या वेदनेत सहभागी होणाऱ्या, रात्रंदिवस अविरत सेवा देणाऱ्या, स्वतःच्या कुटुंबापेक्षा रुग्णांच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या परिचारिकांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोना महामारीच्या काळात आपण सगळ्यांनी परिचारिकांची खरी ताकद अनुभवली. जोखीम असूनही त्या डगमगल्या नाहीत, त्यांनी रुग्णांसोबत मानवतेचा खरा धर्म निभावला. त्या काळात परिचारिका म्हणजे देवदूतच होत्या.
आजच्या या विशेष दिवशी, एका लोकप्रतिनिधीच्या नात्याने, परिचारिकांच्या सेवा-सुविधा, सन्मान व हक्क यांचा विचार करताना शासनाच्या पातळीवर मी नेहमीच तुमच्या पाठीशी उभा राहीन. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.
रुग्णांच्या वेदनेने सुरू झालेला परिचारिकांचा दिवस, रुग्णाच्या चेहऱ्यावरच्या समाधानानेच संपायला हवा. काल ‘मदर्स डे’ साजरा झाला, आज आपण परिचारिका दिन साजरा करत आहोत. परिचारिका ही आईसारखीच शांत, संयमी आणि काळजीवाहू असते. आई आपल्या लेकरासाठी जे करते, तेच एक परिचारिका आपल्या रुग्णासाठी करते. त्यामुळे परिचारिकांचा सन्मान हा समाजाचा महोत्सव असावा, असेही आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला परिचारिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular