Thursday, September 24, 2026
HomeUncategorizedएटापल्लीतील चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’!

एटापल्लीतील चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’!

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या एटापल्ली दौऱ्यात महत्त्वपूर्ण निर्णय; जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून होणार विकास*

हालेवारा व तोडसा येथील दोन आश्रमशाळा तर बुर्गी व पैमा या दोन जिल्हा परिषद शाळांचे ‘मॉडेल शाळां’मध्ये रूपांतर

सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35

गडचिरोली, दि. ७ सप्टेंबर : आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळांचा ‘मॉडेल शाळा’ म्हणून विकास करण्यात येणार आहे. हालेवारा व तोडसा येथील दोन आश्रमशाळांचे ‘मॉडेल आश्रमशाळां’मध्ये, तर तालुक्यातील बुर्गी व पैमा या दोन जिल्हा परिषद शाळांचे ‘मॉडेल शाळां’मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या ४ सप्टेंबर रोजीच्या एटापल्ली तालुका दौऱ्यादरम्यान शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या चारही शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठान मधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एटापल्ली तालुक्यातील अनेक गावे दुर्गम व आदिवासीबहुल भागात वसलेली आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शहरांतील शाळांच्या धर्तीवर आधुनिक शैक्षणिक सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देणे आणि दुर्गम व शहरी भागातील शैक्षणिक सुविधांमधील दरी कमी करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. केवळ शाळांच्या इमारतींचा विकास न करता विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच निवास, क्रीडा, वाचन, तंत्रज्ञान आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

वर्गखोल्यांपासून डिजिटल लायब्ररीपर्यंत आधुनिक सुविधा

मॉडेल आश्रमशाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त वसतिगृह, प्रशस्त डायनिंग हॉल, बहुउद्देशीय सभागृह, क्रीडांगण, डिजिटल लायब्ररी यांसारख्या आधुनिक शैक्षणिक व पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यासोबतच शाळांचा विकास पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने करण्यासाठी सौरऊर्जा प्रणाली आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम उभारण्याचेही नियोजन आहे.

या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाबरोबरच डिजिटल शिक्षण, वाचन, क्रीडा, तंत्रज्ञान आणि विविध सहशालेय उपक्रमांसाठी आवश्यक वातावरण उपलब्ध होणार आहे. विशेषतः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधांसाठी मोठ्या अंतरावर जावे लागू नये आणि त्यांना गावाजवळच दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शाळेतील सहभाग आणि पटसंख्या वाढीस मिळणार चालना

सुसज्ज वर्गखोल्या, उत्तम निवासी व्यवस्था, डिजिटल शिक्षण तसेच क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळेचे वातावरण अधिक शिक्षणपूरक आणि आकर्षक होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती आणि शाळेतील सहभाग वाढण्यास मदत होण्याबरोबरच विद्यार्थी पटसंख्या वाढीसही हा उपक्रम पूरक ठरण्याची अपेक्षा आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना शहराच्या धर्तीवर शिक्षण

मॉडेल शाळांच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल आणि आधुनिक शिक्षणाची दारे अधिक व्यापकपणे खुली होणार आहेत. शहरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या दर्जेदार शैक्षणिक व पायाभूत सुविधांच्या धर्तीवर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही सुविधा उपलब्ध करून देत शैक्षणिक संधींमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

शिक्षणासोबत क्रीडा, तंत्रज्ञान, वाचन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने एटापल्लीतील चार मॉडेल शाळांचा हा उपक्रम दुर्गम व आदिवासी भागातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी पथदर्शी ठरण्याची अपेक्षा आहे.
००००

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular