आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर उचलले पाऊल
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत होणार बैठक
मुख्य संपादक:- राजू एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़
मो न:- 9511673435
मुल – चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात शासकीय तंत्रनिकेतन स्थापन व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात आता राज्य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत उद्या, सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ ला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत शासकीय तंत्रनिकेतन स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा होणार आहे.
आमदार श्री. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुल येथील शासकीय तंत्रनिकेतन आता दृष्टिपथात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत आ. श्री. मुनगंटीवार देखील उपस्थित होते. मंत्री महोदयांनी शासकीय तंत्रनिकेतन स्थापन करण्याच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुलच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडण्यासंदर्भात सूचना व निर्देश दिले होते.
आता यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी २७ जानेवारीला बैठक बोलावली आहे. या बैठकीला आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. मुंबई येथे मंत्रालयात सायंकाळी ५ वाजता होऊ घातलेल्या या बैठकीला विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.
वाघांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे. जिल्ह्याचा नावलौकिक देशात वाढवावा. यासाठी जिल्ह्यातील मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून धरला. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले होते, हे विशेष.
अनेक तालुक्यांमधील तरुणांना होणार लाभ
मुल येथे शासकीय तंत्रनिकेतनची स्थापना झाल्यानंतर मुलसह पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. मुल येथे यापूर्वीच शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शहराच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान मिळत आहे. शासकीय पॉलिटेक्निक सुरू झाल्यास मुल हे शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


