चंद्रपूरच्या बाल स्केटिंगपटूची राष्ट्रीय स्तरावर झेप; 2036 ऑलिंपिकचे स्वप्न..
संपादक: राजेन्द्र त्यारे
सत्यशोधक न्युज महाराष्ट्र
मो .न.9404862389
राष्ट्रभक्ती परिवाराच्या वतीने पुणे येथील वी. का. राजवाडे सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात चंद्रपूरचा उदयोन्मुख बाल स्केटिंगपटू चि. अधीर अमृता सुबोध जुन्नावार याला त्याच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल “राज्यस्तरीय आदर्श क्रीडा रत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रात राज्यभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व गुणवंत व्यक्तींना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यावेळी अधीर जुन्नावार याने अवघ्या साडेचार वर्षांच्या वयात मिळविलेल्या यशाची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्याला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माउंट कार्मेल कॉन्वेंट स्कूल, चंद्रपूर येथे KG 1 मध्ये शिक्षण घेणारा अधीर जून 2025 पासून इनलाईन स्केटिंग या क्रीडा प्रकारात सराव करत आहे. अत्यंत कमी कालावधीत मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील अंडर-5 गटातील इनलाईन स्केटिंग खेळाडू म्हणून जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हातात तिरंगा घेऊन गांधी चौक ते जटपुरा गेट हे अंतर अवघ्या 7 मिनिटांत पूर्ण करत अधीरने देशप्रेमाचा प्रेरणादायी संदेश दिला होता. त्याच्या या आगळ्यावेगळ्या कामगिरीची नोंद Asian Book of World Records मध्ये 11 मार्च 2026 रोजी करण्यात आली असून ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
अधीरने अल्पावधीतच विविध जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चांदा पब्लिक तसेच स्केटिंग असोसिएशन ऑफ चंद्रपूर आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदके पटकावली आहेत. Young Achievers Olympiad मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सहभाग नोंदवला आहे.
याशिवाय नागपूर, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई करत आपल्या कौशल्याची चमक दाखवली आहे. पुणे विमाननगर येथील आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंगवर झालेल्या महाराष्ट्र राज्य ओपन स्पीड स्केटिंग स्पर्धेतही त्याने यश संपादन केले आहे.
अधीरच्या या यशाबद्दल यापूर्वी माउंट कार्मेल कॉन्वेंट स्कूल, आर्य वैश्य समाज, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर, आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वतीने तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्याचा गौरव करण्यात आला आहे.
लहान वयातच शिस्त, आत्मविश्वास, मेहनत आणि देशप्रेम यांचा आदर्श निर्माण करणारा अधीर आज चंद्रपूरचा अभिमान ठरत आहे. त्याचे ध्येय भविष्यात 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे असून त्याच्या या स्वप्नासाठी तो सातत्याने मेहनत घेत आहे.
“लहान वय, मोठे ध्येय” हे अधीरच्या प्रवासातून स्पष्ट होत असून तो भविष्यात भारताचा मान उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रशिक्षक विनोद निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीर जुन्नावारने इनलाईन स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शिस्तबद्ध प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण सरावाच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवा खेळाडूंना घडविण्याचे कार्य केले आहे. अधीरच्या यशामागे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व क्रीडा संस्कारांचा मोठा वाटा आहे.



