Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedचंद्रपूरात मान्सूनची दमदार एन्ट्री; झाडांची पडझड, दुचाकींसह लग्न मंडपाचे नुकसान

चंद्रपूरात मान्सूनची दमदार एन्ट्री; झाडांची पडझड, दुचाकींसह लग्न मंडपाचे नुकसान

सावरकर नगर, बंगली कॅम्प परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; नागरिकांची धावपळ

सत्यशोधक न्यूज
संपादक, सुदर्शन शहा

चंद्रपूर:-शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळी मान्सूनने दमदार हजेरी लावत जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली. अवघ्या काही वेळ झालेल्या मुसळधार पावसामुळे सावरकर नगर, बंगली कॅम्प परिसरासह अनेक भागांत झाडांची पडझड होऊन मालमत्तेचे नुकसान झाले.
याशिवाय वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक झाडे व फांद्या कोसळल्या. झाडाखाली उभ्या असलेल्या काही दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांच्या शेड व पत्र्यांनाही फटका बसल्याची माहिती आहे. झाडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
दरम्यान, सावरकर नगर येथील शिव मंदिर परिसरात लग्न समारंभासाठी उभारण्यात आलेल्या मंडपालाही या वादळी पावसाचा फटका बसला. लग्नाची तयारी सुरू असतानाच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे मंडपाचा काही भाग उखडला जाऊन नुकसान झाले. त्यामुळे आयोजकांची मोठी तारांबळ उडाली.
तसेच सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांत धावपळ उडाली. पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाने नागरिकांना वादळी हवामानात झाडांखाली थांबणे टाळावे, तसेच सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular