मुख्य संपादक -राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्युज महाराष्ट्र
मो.न.9511673435.
मध्यप्रदेशातून चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या आणली जात असलेली विदेशी दारूची खेप स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावली. गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा नंदोरी टी-पॉइंट येथे धाड टाकून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५ (ई)(अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी २९ पेट्यांतील ३५३ विदेशी दारूच्या (७५० मिली) बाटल्या, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टोयोटा इटिओस जीडी (एमएच ०१ बीटी १०८७) कार तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख १५ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त मुद्देमालामध्ये विदेशी दारूची किंमत १ लाख ८३ हजार ८५८ रुपये, टोयोटा इटिओस जीडी कारची किंमत ३ लाख रुपये, तर तीन मोबाईल फोनांची किंमत ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी नरेंद्र जितेंद्र भाट (वय ३१, रा. जलनगर, चंद्रपूर) व सौ. दामिनी नरेंद्र भाट (रा. जलनगर, चंद्रपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सूर्या उर्फ सूरज परसंगे (रा. जालनगर, चंद्रपूर) हा आरोपी फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष निपोनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत एपीआय बलराम झाडोकार, एचसी जयसिंग, संतोष येलपूलवार, गणेश भोयर, सचिन गुरनुले, विठ्ठल काकडे आणि गजानन मडावी यांनी सक्रिय सहभाग घेतला.



