शिवसेना व भारतीय कामगार संघटनेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35
चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर ग्रामपंचायत हद्दीतील कोंडी वॉर्ड क्रमांक ५ येथे अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडितेला आवश्यक वैद्यकीय उपचार, समुपदेशन, पुनर्वसन आणि संरक्षण उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उर्जानगर परिसरात घडलेले हे प्रकरण अत्यंत गंभीर असून अशा गुन्ह्यांमुळे समाजात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास प्राधान्याने पूर्ण करून दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात दाखल करण्यात यावे आणि खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच पीडित मुलीला मोफत वैद्यकीय उपचार, समुपदेशन, पुनर्वसन तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. पीडित कुटुंबाला आवश्यक संरक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच जिल्ह्यात महिलांवरील व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी बल्लारपूर संघटिका तथा राष्ट्रीय हिंदू महासभेच्या महिला जिल्हाध्यक्ष कृष्णाताई सुरमवार, राष्ट्रीय हिंदू महासभेच्या महिला जिल्हा महासचिव सुषमाताई वारजुरकर, जिल्हा सचिव संध्याताई तुरारे, करण कोलगुरी, निखिल सुरमवार यांच्यासह शिवसेना व भारतीय कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



