सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष (निवड समिती) पदी ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू विश्लेषक आणि संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी प्रा. महेश पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या बळकटीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. पानसे यांनी संघटनेच्या विस्तारासाठी प्रभावी नेतृत्व केले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी आणि राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी नियुक्तीचे आदेश जारी केले.
प्रा. पानसे यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, नागपूर विभागाध्यक्ष, विदर्भ अध्यक्ष आणि राज्य उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी विविध अग्रगण्य वृत्तपत्रांमधून दर्जेदार आणि निर्भीड पत्रकारिता करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संघटनेत गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने कार्यरत राहून त्यांनी विशेषतः विदर्भात संघटनेचा विस्तार घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली चिमूर, ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे पत्रकारांची भव्य राज्य अधिवेशने यशस्वीपणे पार पडली. तसेच अनेक नवोदित पत्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत संघटनात्मक चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
प्रा. महेश पानसे यांच्या प्रदेशाध्यक्ष (निवड समिती) पदावरील नियुक्तीचे राज्यभरातील पत्रकारांनी स्वागत केले असून, संघटनेचे राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुका पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.



