इंग्रजकालीन पुलावरून दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असल्याने अपघाताचा धोका; रस्त्यावर चिखल व गाळ साचल्याने वाहनचालक त्रस्त.
सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35
राजुरा/बल्लारपूर :-सततच्या पावसामुळे वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून राजुरा–बल्लारपूर मार्गावरील इंग्रजकालीन पुलावरून पाणी भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व गाळ साचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एवढ्या जुन्या आणि अरुंद पुलावर एकावेळी एका बाजूचीच वाहतूक सोडणे आवश्यक असताना प्रत्यक्षात दोन्ही बाजूंनी वाहने एकाच वेळी पुलावरून जात आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनांसह एसटी बस, गॅस टँकर, दुचाकी आणि इतर वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रभुदास तांड्रा यांनी प्रशासनाकडे तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस व महसूल यंत्रणा तैनात करण्याची मागणी केली आहे. तसेच पुलावर एकावेळी एकाच बाजूची वाहतूक सोडून नागरिकांच्या जीविताची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



