२ ऑगस्टला चंद्रपुरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया व कर्णयंत्र वाटप
चंद्रपूर, प्रतीनीधी
सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त रविवार, २ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी भव्य निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत राजीव गांधी महाविद्यालय, इंदिरा नगर, मूल रोड, चंद्रपूर येथे हे शिबिर होणार असून, विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार, मार्गदर्शन आणि औषधोपचार करणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, टाटा ट्रस्ट केअर फाउंडेशन, चंद्रपूर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर तसेच आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात हृदयरोग, किडनीरोग, मेंदूरोग, सर्वसाधारण औषधोपचार, शस्त्रक्रिया, बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग आणि दंतरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत. रक्तदाब, मधुमेह, ताप, हृदयविकार, किडनीचे आजार, हर्निया, थायरॉईड, मोतीबिंदू, सांधेदुखी, त्वचारोग, दंतविकार, महिलांचे आजार आणि बालरोगांसह विविध आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे मोफत रक्ततपासणी, नेत्र तपासणी, कॅन्सर रोगनिदान, आवश्यक औषधांचे विनामूल्य वितरण, पात्र लाभार्थ्यांना निःशुल्क कर्णयंत्र वाटप तसेच गरजेनुसार शस्त्रक्रिया आणि पुढील उपचारांची संपूर्ण मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तपासणीनंतर ज्या रुग्णांना अधिक तपासण्या अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल, त्यांच्यावर संबंधित रुग्णालयात विनामूल्य उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या महाआरोग्य शिबिराचे आयोजन आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराने केले असून डॉ. मंगेश गुलवाडे हे मुख्य संयोजक आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



