Wednesday, August 5, 2026
HomeUncategorizedविद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू; दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मार्ग मृत्यूचा सापळा!

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू; दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मार्ग मृत्यूचा सापळा!

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेनेचा एल्गार

सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35

चंद्रपूर शहरातील दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडे जाणारा मुख्य रस्ता आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज शाळेत ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांची खोली आणि आकार लक्षात येत नाही. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, या मार्गाची दुरवस्था ही नवीन नसून अनेक दिवसांपासून नागरिक त्रस्त आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने प्रशासनाच्या उदासीन कारभारावर संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा अधिकाऱ्यांची निष्क्रियता महत्त्वाची ठरत आहे का, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता पगारे तसेच विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता टांगले यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली.

निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, शाळेकडे जाणारा हा मार्ग विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा मुख्य रस्ता असून त्यावरील प्रत्येक खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ जागे होणे आवश्यक आहे.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या,

१)रस्त्याची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा.

२)सर्व धोकादायक खड्डे ७ दिवसांच्या आत बुजवून वाहतूक सुरक्षित करावी.

३)निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

४)विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संपूर्ण मार्गाचे दर्जेदार व टिकाऊ डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण तातडीने करावे.

संतोष पारखी यांनी इशारा देताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणालाही खेळू देणार नाही. प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील.”

यावेळी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर व शिवसेना चंद्रपूर उप-तालुका प्रमुख विक्की महाजन उपस्थित होते.

प्रशासनासाठी इशारा…

शाळेकडे जाणारा रस्ता सुरक्षित ठेवणे ही केवळ विकासाची बाब नसून विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित जबाबदारी आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आजच उपाययोजना करणे गरजेचे आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग तातडीने कारवाई करतो की नेहमीप्रमाणे कागदोपत्री आश्वासनांवरच वेळ घालवतो, याकडे पालकांसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular