सहा महिने ते वर्षभर प्रकरणे प्रलंबित; नागरिकांची हेलपाटे, जबाबदारांवर कारवाईची मागणी
सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35
चंद्रपूर,
जिल्ह्यात जन्म व मृत्यू नोंदणीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या अवाजवी विलंबामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक, आर्थिक व प्रशासकीय त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन सादर करण्यात आले.
महिला जिल्हाध्यक्षा सौ. किरणताई गेडाम यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नागरिकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह नियमानुसार अर्ज दाखल करूनही अनेक जन्म व मृत्यू नोंदणीची प्रकरणे तब्बल सहा महिने ते एक वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून प्रशासनाच्या दिरंगाईचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
जन्म व मृत्यू दाखले हे शिक्षण, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वारसा हक्क, मालमत्ता हस्तांतरण, बँक व्यवहार तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्र असल्याने त्यांचा वेळेत मिळणारा अभाव नागरिकांच्या अनेक कामांमध्ये अडथळा निर्माण करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित जन्म व मृत्यू नोंदणी प्रकरणांचा तातडीने आढावा घेऊन विशेष निवारण मोहीम राबविणे, निश्चित कालमर्यादेत सर्व प्रकरणांचा निपटारा करणे, विलंबास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करणे तसेच भविष्यात अशा प्रकारची दिरंगाई होऊ नये यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्याची मागणी आरपीआय (आठवले)च्या वतीने करण्यात आली.
यावेळी निवेदन सादर करताना हंसराज वनकर, ॲड. मुरलीधर आमटे, ॲड. शैलेंद्र देशकर, किरण घाटे, रमेश अंबादे, रीमा सिंह, बिंदुताई गडलिंग, शांती राजू रॉय, तृप्ती कुळमेथे, अंजली काटवले, कविता शेडमाके, मंगला थेरकर आणि सुप्रिया गिरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन सर्व प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला.



