Friday, August 7, 2026
HomeUncategorizedपातागुडम-सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीला वेगजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर तातडीने कामास सुरुवात

पातागुडम-सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीला वेगजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर तातडीने कामास सुरुवात

सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35

गडचिरोली,

सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. कायमस्वरूपी सुधारणेची प्रक्रिया सुरू असतानाच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खड्डे बुजविणे व रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारक, प्रवासी, शेतकरी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करून दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विभागाने त्वरित हालचाल करत प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरील पोचमपल्ली (साखळी क्र. 22/500) ते पातागुडम (साखळी क्र. 57/000) हा रस्त्याचा भाग मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाला असून या संपूर्ण लांबीवर तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे.

सिरोंचा ते पातागुडम रस्त्याची देखभाल यापूर्वी विशेष प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभाग, गडचिरोली यांच्याकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. पोचमपल्ली ते पातागुडम या रस्त्याच्या अस्तित्वातील रुंदीमध्ये दुरुस्ती व डांबरीकरण करण्याच्या कामास केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदार नियुक्तीची कार्यालयीन कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावरील क्षतिग्रस्त भागात, विशेषतः सोमनपल्ली गावाजवळ, वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने युद्धपातळीवर खड्डे बुजवून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular