रामजी यादवच्या माध्यमातून धमकी दिल्याचा अनुप यादव यांचा तक्रारीत दावा; सीसीटीव्ही फुटेज जतन करून निष्पक्ष चौकशीची मागणी.
मुख्यसंपादक :राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज
मो. न. 95 11 67 34 35
चंद्रपूर,
भावाच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य परिस्थिती समोर यावी, यासाठी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करणाऱ्या अनुप चंद्रपाल यादव यांनी आपल्याला अप्रत्यक्षपणे धमकी देण्यात आल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या तक्रारीत त्यांनी पोलीस कर्मचारी किशोर वाकाटे यांच्यावर गंभीर आरोप केले असून, रामजी यादव यांच्या माध्यमातून आपल्याला धमकी देण्यात आल्याचा दावा केला आहे.
तसेच अनुप यादव यांनी ८ ऑगस्ट २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे बंधू स्व. दिलीप चंद्रपाल यादव यांच्या मृत्यू/आत्महत्या प्रकरणात ते स्वतः तक्रारदार आहेत.
सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर यावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, अनुप यादव यांनी या प्रकरणाच्या संदर्भात पोलीस कर्मचारी किशोर वाकाटे यांच्या भूमिकेबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी चौकशी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या भावाने किशोर वाकाटे यांच्याकडून त्रास व धमकी दिली जात असल्याचे आपल्याला सांगितले होते. तसेच इतर व्यक्तींच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा किंवा फसविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही भावाने सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
बसस्थानक परिसरात झाली भेट
अनुप यादव यांच्या तक्रारीनुसार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता चंद्रपूर शहरातील बसस्थानकाजवळील गिरीराज हॉटेलसमोर त्यांची बालपणीचे मित्र रामजी यादव यांच्याशी अचानक भेट झाली.
यावेळी झालेल्या चर्चेत किशोर वाकाटे यांचा विषय निघाला.
रामजी यादव यांनी किशोर वाकाटे यांच्याबाबत काही म्हणणे सांगितल्याचे अनुप यादव यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर रामजी यादव यांनी, “मीही अनुप यादवला सोडणार नाही. मी फसलो तर त्यालाही सोडणार नाही,” अशा आशयाचे वक्तव्य किशोर वाकाटे यांनी केल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या वक्तव्यामुळे आपल्याला ही अप्रत्यक्ष धमकी असल्याचे जाणवल्याचे अनुप यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तसेच आपण धमक्यांना घाबरणार नसल्याचे रामजी यादव यांना सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
राजू कुकडे घटनास्थळी आल्याचा दावा
तक्रारीनुसार, सदर संभाषणानंतर अनुप यादव यांचा मित्र राजू कुकडे घटनास्थळी आला. त्याची रामजी यादव यांच्याशी भेट झाली आणि त्यानंतर रामजी यादव तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आवश्यक असल्यास राजू कुकडे यांचा जबाब नोंदविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर गिरीराज हॉटेल इमारत, चंद्रपूर शहर बसस्थानक परिसर तसेच आजूबाजूच्या दुकाने व इमारतींमध्ये उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज तातडीने जतन करून तपासण्यात यावे, अशी मागणी अनुप यादव यांनी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेच्या वेळी कोण कोण उपस्थित होते आणि घटनाक्रम काय होता, याची पडताळणी होऊ शकते, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
आनखी कुटुंबाच्या सुरक्षेचीही मागणी
भावाच्या मृत्यू प्रकरणात आपण कायदेशीर मार्गाने आवाज उठवत असल्याने आपल्यावर दबाव आणण्याचा किंवा चौकशीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न होत आहे का, याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
तसेच स्वतःच्या व कुटुंबीयांच्या सुरक्षिततेस कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक व कायदेशीर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.
संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्याची मागणी
तक्रारीतील आरोपांनुसार या प्रकरणात पोलीस कर्मचारी संबंधित असल्याने चौकशीवर कोणताही पक्षपात होऊ नये, यासाठी किशोर वाकाटे यांची चंद्रपूर शहराबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणीही अनुप यादव यांनी केली आहे.
आपल्याला कोणाशीही वैयक्तिक वाद निर्माण करायचा नसून, आपल्या भावाच्या मृत्यू प्रकरणातील सत्य परिस्थिती समोर यावी आणि स्वतःला अथवा कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची धमकी, दबाव किंवा इजा होऊ नये, एवढीच मागणी असल्याचे त्यांनी तक्रारीच्या शेवटी स्पष्ट केले आहे.
या तक्रारीच्या प्रती नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक, सीआयडी नागपूरचे पोलीस अधीक्षक, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक तसेच सीआयडी चंद्रपूरच्या चौकशी अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, तक्रारीतील आरोपांची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार असून, संबंधित पोलीस कर्मचारी किशोर वाकाटे यांची या आरोपांबाबतची बाजू समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून होणाऱ्या अधिकृत चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल.



