फेरतपासणीचा अहवाल 3 महिन्यांनी उशिरा.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) यांचे स्पष्टीकरण.
चंद्रपूर, दि. 10 :
सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35
महिला व बाल विकास विभागाच्या निर्धारित पाक कृतीनुसार अंगणवाडी केंद्रांमधील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त संस्थेमार्फत करण्यात येतो. अंगणवाडी केंद्रात आहार प्राप्त झाल्यानंतर लगेच मान्यता प्राप्त प्रयोगशाळेतून आहाराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोणतीही तफावत दिसून आली नाही. जानेवारी महिन्यात पोषण आहाराचा पहिला अहवाल चांगला आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग) भागवत तांबे यांनी स्पष्ट केले.
वितरित करण्यात आलेल्या पूरक पोषण आहारातील नमुने, फेरतपासणीसाठी प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंडपिपरी व बाल विकास प्रकल्प अधिकारी पोंभुर्णा यांच्या मार्फत 18 डिसेंबर 2025 रोजी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या 30 मार्च 2026 रोजीच्या तपासणी अहवालानुसार काही नमुन्यांबाबत निर्धारित निकषांनुसार नमुना अनुरूप नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. नमुना स्वीकारल्याचा दिनांक व प्रत्यक्ष आहाराच्या तपासणीचा दिनांक यामध्ये तीन महिन्याचा कालावधी लोटला गेला. तसेच पोषण आहारातील गहू आणि तांदूळ भारतीय अन्न महामंडळ यांच्याकडून उपलब्ध होतो.
सदर अहवाल प्राप्त होताच महिला व बालविकास कार्यालयाने तात्काळ गोंडपिपरी आणि पोंभुर्णा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून आहाराच्या वितरणाबाबतची माहिती व अहवाल मागवून घेतला. प्राप्त अहवालांची तपासणी केली असता, सदर पूरक पोषण आहारामध्ये जिवंत किडे असल्याबाबत डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये कोणतीही तक्रार प्राप्त नाही, प्रयोगशाळा अहवाल 30 मार्च व 22 एप्रिल 2026 ला प्राप्त आहे.
बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका/पर्यवेक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांना आवश्यक त्या नियमित सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आहाराचा साठा, प्राप्तीच्या वेळी आहाराची गुणवत्ता, पॅकिंग, मुदत, रंग, वास, चव व इतर दृश्यमान बाबींची तपासणी करूनच आहाराचे वितरण करणे तसेच संशयास्पद किंवा गुणवत्तेबाबत शंका असलेला आहार बालकांना वितरित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बालकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे, ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता असून, आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार किंवा शंका आढळल्यास ती तात्काळ संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयास कळविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग, जि.प.) भागवत तांबे यांनी केले आहे.



