Wednesday, June 24, 2026
HomeUncategorized"दारू दुकानांसाठी वेगळे नियम, शासकीय कार्यालयांसाठी वेगळे का?" सुरेशभाऊ पाईकराव यांचा प्रशासनाला...

“दारू दुकानांसाठी वेगळे नियम, शासकीय कार्यालयांसाठी वेगळे का?” सुरेशभाऊ पाईकराव यांचा प्रशासनाला सवाल.

घुग्घुसमधील देशी दारू दुकानाच्या परवानगीची चौकशी करण्याची मागणी; नियमभंग आढळल्यास परवाना रद्द करण्याची मागणी…

मुख्य संपादक
सत्यशोधक न्यूज

✍️राजु नामदेवराव शंभरकर
95 11 67 34 35

घुग्घुस शहरातील धार्मिक स्थळे, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, सार्वजनिक स्मारके तसेच राज्य महामार्गालगत सुरू असलेल्या देशी दारू दुकानाच्या परवानगीबाबत आजाद समाज पार्टीचे विदर्भ सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन सादर करून संबंधित परवान्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात पाईकराव यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर उपरोधिक भाष्य करत विचारले की, धार्मिक स्थळांच्या शेजारी, पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयांच्या परिसरात देशी दारू दुकानांना परवानगी देणे नियमसंगत असेल, तर त्याच निकषांवर जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरातही अशा परवानग्या का दिल्या जात नाहीत?
पाईकराव यांनी प्रशासनासमोर स्पष्ट भूमिका मांडत म्हटले आहे की, जर अशा परवानग्या नियमांनुसार दिल्या जात असतील तर सर्वत्र समान निकष लागू करावेत; अन्यथा घुग्घुस येथील संबंधित देशी दारू दुकानाच्या परवान्याची तातडीने चौकशी करून नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करावी.
“कायदा आणि नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. सामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि प्रभावशाली घटकांसाठी दुसरा नियम असू शकत नाही,” असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. संबंधित परवानगी प्रक्रियेतील वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी तसेच चौकशीत कोणताही गैरप्रकार, निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, संबंधित देशी दारू दुकानास देण्यात आलेली परवानगी नियमबाह्य असल्याचे निष्पन्न झाल्यास ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनामुळे घुग्घुस शहरात दारू दुकानांच्या परवानगी प्रक्रियेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular