Friday, August 7, 2026
HomeUncategorizedवेळीच धावले महामार्ग पोलीस; हृदयविकाराचा झटका आलेल्या चालकाचे प्राण वाचले.

वेळीच धावले महामार्ग पोलीस; हृदयविकाराचा झटका आलेल्या चालकाचे प्राण वाचले.

ऑपरेशन यू-टर्नदरम्यान मानवतेचे दर्शन; महामार्ग पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक .

मुख्य संपादक -राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्युज महाराष्ट्र
मो.न.9511673435

चंद्रपूर,

चंद्रपूर महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना दाखविलेल्या तत्परतेमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या एका वाहनचालकाचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना शनिवारी (२७ जून) घडली.
महामार्ग पोलीस केंद्र चंद्रपूरचे कर्मचारी पोलीस हवालदार संजय थेरे, पोलीस नाईक राकेश हेडाऊ आणि पोलीस नाईक वकील राठोड हे कोंढा फाटा येथे ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेदरम्यान कर्तव्यावर होते. त्यावेळी वरोरा येथून चंद्रपूरकडे येत असलेल्या कारचालकाला अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. चालकाने तातडीने महामार्ग पोलिसांकडे मदतीची विनंती केली.
क्षणाचाही विलंब न करता पोलीस हवालदार संजय थेरे यांनी एमटीए माईन येथील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने चालकाला तातडीने चंद्रपूर येथील डॉ. वरगंटीवार यांच्या रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, संकेत गुंजेवार (वय ४०), व्यवसाय ठेकेदारी, रा. स्नेहनगर, गजानन मंदिर वॉर्ड, चंद्रपूर यांना वेळेत रुग्णालयात आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
या प्रसंगी रुग्णाचे नातेवाईक तसेच डॉ. वरगंटीवार यांनी महामार्ग पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतावादी भूमिकेचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले.
ही कार्यवाही महामार्ग पोलीस मदत केंद्र, चंद्रपूरच्या प्रभारी अधिकारी सपोनि माया चाटसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कर्तव्याबरोबरच माणुसकी जपणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या या कार्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular