Friday, August 7, 2026
HomeUncategorizedस्थानिक पुनर्वसित बेरोजगारांचा ३० जूनपासून बेमुदत मुक्कामी आंदोलनाचा इशारा .

स्थानिक पुनर्वसित बेरोजगारांचा ३० जूनपासून बेमुदत मुक्कामी आंदोलनाचा इशारा .

K.V.R. कंपनीसमोर धरणे; रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी .

संपादक : राजेन्द्र आर तराले
सत्यशोधक न्युज महाराष्ट्र
मो.न.9404862389.

चंद्रपूर,

सिनाळा, मसाळा (जुना) व नवगाव परिसरातील स्थानिक पुनर्वसित बेरोजगार युवक, महिला व ग्रामस्थांनी रोजगाराच्या मागणीसाठी दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून K.V.R. कंपनी कार्यालयासमोर बेमुदत मुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात दुर्गापूर पोलीस ठाण्याकडे आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली असून, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) तसेच K.V.R. कंपनीला आंदोलनाची अधिकृत लेखी सूचना देण्यात आली आहे.
तसेच आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, रोजगाराच्या प्रश्नावर यापूर्वी अनेक वेळा निवेदने, बैठका, पाठपुरावा व चर्चा करूनही स्थानिक पुनर्वसित बेरोजगारांना रोजगाराबाबत कोणताही ठोस, लेखी व समाधानकारक निर्णय मिळालेला नाही. त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही व शांततामय मार्गाने बेमुदत मुक्कामी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय निवेदनात आंदोलन पूर्णपणे शांततामय व कायद्याच्या चौकटीत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान धरणे, घोषणाबाजी, जनजागृती, निवेदन सादरीकरण, सामूहिक चर्चा तसेच आदिवासी सांस्कृतिक पद्धतीने जनजागृती करण्यात येणार आहे. आंदोलनस्थळी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचार, स्वयंसेवक, बॅनर-फलक व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
तसेच आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये स्थानिक पुनर्वसित बेरोजगारांना रोजगारात प्रथम प्राधान्य, रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया पारदर्शक व वेळबद्ध पद्धतीने राबविणे, तसेच रोजगाराबाबतचा लेखी आदेश व अधिकृत निर्णय जाहीर करणे यांचा समावेश आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व शुभम भाऊ गेडाम (आदिवासी महामंत्री, जि. चंद्रपूर) व परमेश्वर बालाजी मडावी (गट ग्रामपंचायत सदस्य) करीत असून, संबंधित प्रशासन, WCL व K.V.R. कंपनीने स्थानिक पुनर्वसित बेरोजगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन रोजगाराचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

(टीप : हे वृत्त आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या आधारे तयार करण्यात आले आहे. संबंधित कंपनी किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular