सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35
"प्रतिबंध हाच उपचाराचा श्रेष्ठ उपाय" हा संदेश देत इंडियन रेड क्रॉस सोसायटी, चंद्रपूर शाखा आणि चंद्रपूर ॲडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय परिसरात भव्य आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबिर उत्साहात पार पडले. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित शिबिराला ॲडव्होकेट, त्यांचे कुटुंबीय, न्यायालयीन कर्मचारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दरम्यान शिबिरात कान-नाक-घसा, स्त्रीरोग, त्वचारोग, दंतरोग, कॅन्सर तपासणी, रक्तदाब, मधुमेह (रक्तातील साखर), बोन मॅरो डेन्सिटी, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, हिमोग्लोबिन चाचणी, पॅप स्मिअर टेस्ट आदी महत्त्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले.
यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे यांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, "प्रतिबंध हाच उपचाराचा श्रेष्ठ उपाय आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, व्यसनमुक्त जीवन आणि मानसिक तणावाचे योग्य व्यवस्थापन हे निरोगी आयुष्याचे पाच आधारस्तंभ आहेत. रोगांचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होतात आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते." त्यांनी भविष्यातही अशा लोकहिताच्या आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
या शिबिराचे नियोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, उपसचिव डॉ. संजय घाटे, कोषाध्यक्ष सीए शादाब चिनी, प्रोजेक्ट डायरेक्टर अश्विनी खोबरागडे आणि डॉ. आशिष बारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर ॲडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विक्रम टंडन, उपाध्यक्ष अमन मारेकर, सचिव ॲड. किनीकर, ॲड. गिरीश मारल्यावर, ॲड. आशिष धर्माधिकारी, ॲड. बजाज, ॲड. वैशाली कवाडे यांच्यासह पदाधिकारी व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रसंगी शिबिरात डॉ. बी. एच. दाबेरे, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. मनीषा घाटे, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. चेतन नागरेचा, डॉ. रोहन कोटकर, डॉ. अनुजा कोटकर, डॉ. संदीप पिपरे, डॉ. राहुल नगराळे, डॉ. चैतन्य नंदावरे, डॉ. उमेश सरोसे, डॉ. आयुषी गुप्ता, डॉ. अनुजा लोणकर आणि डॉ. दीक्षाय वाकडे यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.
याशिवाय मोठ्या संख्येने ॲडव्होकेट, त्यांचे कुटुंबीय, न्यायालयीन कर्मचारी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य जनजागृती, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत औषध वितरण यांचा संगम असलेला हा उपक्रम सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला.



