अकोला, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात चंद्रपूर शाखेचे सोशल मीडिया उपाध्यक्ष तथा सत्यशोधक न्यूजचे मुख्य संपादक राजू शंभरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
हा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, राज्य मार्गदर्शक तथा सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे आणि विदर्भ अध्यक्ष नयन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य, सामाजिक प्रश्नांवरील निर्भीड लेखन आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याच्या योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. यावेळी राज्यभरातील पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल विविध स्तरातून राजू शंभरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



