नाकाबंदीदरम्यान चालकाने वाहन न थांबविता भरधाव पळ काढला; घोडपेठ येथे कार सोडून फरार, पोलिसांचा शोध सुरू
सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35
भद्रावती पोलिसांनी अवैध विदेशी दारूच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख ३६ हजार ७६८ रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार जप्त केली. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. मात्र, मौजा घोडपेठ येथील शंकर हेअर सलून समोर कार सोडून चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) अन्वये भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने मारुती सुझुकी स्विफ्ट ZDI (क्र. MH-04-HF-1208) या कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार भद्रावती टप्पा येथे नाकाबंदी करण्यात आली. संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबविण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगाने चंद्रपूरच्या दिशेने नेले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. त्यानंतर घोडपेठ येथे कार बेवारस अवस्थेत आढळून आली.
वाहनाची तपासणी केली असता ऑफिसर चॉईस विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १,७२८ निप (३६ बॉक्स) किंमत २ लाख ९५ हजार ४८८ रूपये तसेच ९० मिलीच्या ४८० निप (५ बॉक्स) किंमत ४१ हजार २८० रूपये असा एकूण ३ लाख ३६ हजार ७६८ रूपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
याशिवाय ५ लाख किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ८ लाख ३६ हजार ७६८ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकासह या अवैध दारू वाहतुकीमागील संबंधितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (वरोरा) संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, सहाय्यक फौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, पोलीस हवालदार देवानंद डुकरे, पोलीस हवालदार गोपाल आतकुलवार, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, पोलीस अंमलदार योगेश घाटोळे आणि पोलीस अंमलदार संतोष राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला.



